|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
बँकेची नोंदणी दिनांक २४ मे १९५७ रोजी क्रमांक २४५०७ ने मा.एफ.एन.राणा,निबंधक सहकारी संस्था मुंबई राज्य ,पुणे यांनी केली. सन १९२५ च्या मुंबई सहकारी मंडळाच्या ७ व्या कायद्याप्रमाणे सदर जिल्हा सहकारी बँक रजिस्टर करण्यात आली. १६ अभ्यासू व्यक्ती आणि १४ नामवंत सहकारी संस्था यांनी मूळ नोंदणी अर्जावर सह्या केल्या आहेत. यामध्ये चिपळूण तालुक्यातील सहकारी कार्यकर्त्यांचा फार मोठ्या प्रमाणात सहभाग होता. पहिले शासन नियुक्त संचालक मंडळ श्री. बी.जी.खातू यांचे अध्यक्षतेखाली नेमण्यात आले होते. अनेक तांत्रिक अडचणीमुळे जिल्हा सहकारी बँकेचे कामकाज प्रत्यक्षात ५ डिसेंबर ५८ पासून सुरु झाले. त्यावेळी सदर बँक स्थापन करताना आवश्यक असणारे भांडवल रु. ५ लाख भागभांडवलाची पुर्तता या जिल्ह्याकडून होवू न शकल्याने रिझर्व बँकेने आपले धोरण बदलून खास सवलत म्हणून रु. ८२ हजार पर्यंतची मर्यादा खाली आणली. मात्र प्रत्यक्ष कामकाज सुरु करताना बँकेचे भागभांडवल ८७,८५५ /- जमविण्यात आले होते. तसेच त्यावेळी राज्य सहकारी बँकेच्या सावंतवाडी,कुडाळ व दापोली या तीन ठिकाणी शाखा कामकाज करीत होत्या. त्यावेळी एकत्रित रत्नागिरी जिल्हा होता.मात्र १९८१ साली जिल्ह्याचे विभाजन होवून दि. १ जुलै १९८३ रोजी बॅंकेचेही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन बँकांमध्ये विभाजन झाले.त्यावेळी या बँकेकडे ९ तालुक्यातील ३८ शाखा राहिल्या व सहा तालुक्यातील २६ शाखा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आल्या. |
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||